मॉस्को - रशियाचे अध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची पाठराखण केली आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग हा मुद्दाम रचण्यात आलेला कट असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच, हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शेवट नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाभियोग प्रस्तावाबाबत अजून सिनेटमध्ये चाचणी होणे बाकी आहे. सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. मुद्दाम रचण्यात आलेल्या खोट्या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याच पक्षाच्या प्रतिनिधीला ते नक्कीच अध्यक्षपदावरून हटवणार नाहीत, असे पुतीन यांनी म्हटले आहे. अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधींच्या सभागृहात ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाला मान्यता मिळाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना पुतीन यांनी हे मत व्यक्त केले आहे. तसेच, महाभियोग प्रकरण हा अमेरिकेचा अंतर्गत मुद्दा आहे. ही केवळ दोन पक्षांमधील लढाई असल्याचेही ते म्हणाले.