लंडन - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवण्याचा निर्णय भारताने घेतला. यानंतर पाकिस्तान मिळेल त्या मार्गाने भारतावर आगपाखड करत आहे. नुकतीच पाक समर्थक भारताच्या लंडनमधील उच्चायुक्तालयासमोर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचे झेंडे घेऊन निदर्शने केली. निदर्शकांनी हिंसक पवित्रा घेत अंडी आणि दगड भिरकावून उच्चायुक्तालयाच्या काचा फोडल्या. तसेच, इमारतीच्या परिसरातही नुकसान झाले आहे.
भारतीय उच्चायुक्तालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली असून, फोटो शेअर केले आहेत. 'आज भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर आणखी हिंसक निदर्शने, ३ सप्टेंबर २०१९ . इमारतीच्या परिसरात नुकसान,' असे ट्विट उच्चायुक्तालयाने केले आहे. हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. पाकिस्तानी समर्थकांनी या विरोध प्रदर्शनाला ‘काश्मीर फ्रीडम मार्च’ नाव दिले होते. पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्तालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. याचे नेतृत्व युकेमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केले. याआधी १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनी उच्चायुक्तालयावर असाच हल्ला झाला होता.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर, भारतीयांकडून जोरदार स्वागत