म्युनिच - जगभरातील सर्वच देश अधिकाधिक राष्ट्रवादी बनत चालले आहेत. यातून अमेरिका आणि चीनसुद्धा सुटलेले नाहीत. या कारणामुळे जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये राष्ट्रवादी विचारांची सरकारे उदयाला येत आहेत. यामुळे जग वैचारिक आणि बहुपक्षीय राजकारणातील वैविध्य हरवत चालले आहे. सर्व जगालाच एकसुरीपणा येत आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले. ते जर्मनीतील म्युनिच सुरक्षा परिषदेत बोलत होते.
'कशामुळे जगातील बहुढंगीपणा नाहीसा होत आहे? जगभरातील आर्थिक संतुलन पुन्हा प्रस्थापित होत असतानाच यामुळे राजकीय संतुलनही आपोआप बदलले जाऊन ते पुनर्स्थापित होत आहे. यामुळे विविध कंगोरे नाहीसे होऊन विविधांगी असलेले जग एकांगी बनत आहे,' असे जयशंकर म्हणाले. 'मागील २० वर्षांमध्ये आपण जगभरात आर्थिक समतोल पुन्हा स्थापन झालेला पाहिला आहे. त्याचेच रूपांतर राजकीय उलटफेर होऊन त्यामध्ये नवा समतोल निर्माण होण्यात होत आहे. असे घडत असेल तर, सध्या आपण संक्रमणाच्या युगात आहोत,' असे विचार त्यांनी मांडले.