कीव - रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी अद्यापही युद्ध भागात अडकलेले आहेत. नुकतेच रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या दोन भारतीय तरुणांचा मृत्यू झाला. तर आज एका भारतीय विद्यार्थ्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या विद्यार्थ्याला फेब्रुवारीच्या २७ - २८ तारखेच्या रात्री तीन ते चार गोळ्या लागल्याची घटना घडली. त्यानंतर दोन मार्चला हा विद्यार्थी शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. सध्या त्याची प्रकृती बरी आहे. मात्र या विद्यार्थ्याने शुद्धीवर आल्यानंतर भारतीय दुतावासासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली मात्र दुतावासाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्याने माध्यमांसोबत झालेल्या संवादात म्हटले आहे. मी गोळीबारात जखमी झालो आहे, याची माहिती भारतीय दुतावासाला दिल्यानंतरही भारतीय दुतावासातील आधिकारी मदतीसाठी आले नाही, असे या विद्यार्थ्याने म्हटले आहे.
'अद्याप दुतावासाची मदत नाही'
दिल्ली येथील तरुणाला युक्रेन रशिया युद्धादरम्यान कीव येथे गोळ्या लागल्या होत्या. हरजोत सिंग असे गोळ्या लागलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने माध्यमांशी संपर्क साधला आहे तो म्हणाला आहे की, "भारतीय दूतावासाकडून अद्याप कोणतेही सहकार्य मिळालेले नाही. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, दररोज ते म्हणतात की आम्ही काहीतरी करू, परंतु अद्याप मदत मिळालेली नाही," युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अनेक गोळ्यांनी जखमी झालेल्या भारतीय कीव रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे त्याने सांगितले.