मर्सिडीझ फॉर्म्युला वन (एफ-1) संघाने कोरोना विषाणूच्या रुग्णांना श्वसनासाठी सहाय्य करणारे यंत्र विकसित करण्यासाठी योगदान दिले असून, आता या यंत्राच्या वापरामुळे कोरोनाबाधित रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज राहणार नाही. याशिवाय, ब्रिटनमधील आरोग्य सेवांवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.
ब्रिटनमधील सात संघांचा सहभाग असणाऱ्या सामाईक प्रयत्नांचा भाग म्हणून, मर्सिडीझने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील अभियंते आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल येथील वैद्यांसोबत मिळून एक यंत्र विकसित केले आणि त्यात काही बदल केले आहेत. हे यंत्र ऑक्सिजन मास्क आणि संपुर्ण व्हेंटिलेशनची गरज यांच्यातील अंतर कमी करण्यास मदत करते. कन्टिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) असे या यंत्राचे नाव ठेवण्यात आले आहे. या महामारीदरम्यान इटली आणि चीनमधील रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणूने ग्रस्त रुग्णांच्या फुफ्फुसांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी या यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. औषधे आणि आरोग्य उत्पादने नियमन संस्थेने या यंत्रास हिरवा कंदील दाखवला आहे.
ब्रिटनमध्ये या नव्या यंत्राचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली असून देशातील विविध रुग्णालयांमध्ये सुमारे १०० यंत्रे चाचणीसाठी पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती युसीएलच्या वतीने देण्यात आली आहे. देशभरातील रुग्णालयांमध्ये मर्सिडीझकडून तातडीने ही यंत्रांची पाठवणी होण्याची शक्यता आहे. युसीएलमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक टिम बेकर म्हणाले की, वैद्यांनी फॉर्म्युला वनमध्ये असलेल्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला, ज्याअंतर्गत कामासाठी लागणारा काही वर्षांचा कालावधी काही दिवसांवर आणता येऊ शकतो, आणि सुरुवातीला झालेल्या बैठकीनंतर यंत्र विकसित करण्यासाठी १०० तासांपेक्षा कमी कालावधी लागला.
“सर्वोच्च मानकांच्या सहाय्याने आणि शक्य तेवढ्या लवकर सीपीएपी प्रकल्प पुर्ण करण्यासाठी युसीएलच्या सेवेत आमची संसाधने उपलब्ध करुन दिल्याचा अभिमान आहे", असे मर्सिडीझचे व्यवस्थापकीय संचालक अँडी कॉवेल म्हणाले.
सीपीएपी यंत्राचा वापर स्लीप एप्नियावर (झोपेत असताना श्वसनात अडथळे निर्माण होण्याचा आजार) उपचारासाठी वापरला जातो. हे यंत्र हवा-ऑक्सिजन यांचे मिश्रण सातत्याने तोंड आणि नाकावाटे आत सोडते. अनेक रुग्णांसाठी सीपीएपी हा चांगला पर्याय ठरु शकतो कारण त्यासाठी लागणारी जागाही कमी असते. केवळ ऑक्सिजन पुरेसा ठरत नाही अशावेळी इटली आणि चीनमध्ये कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी या यंत्राचा वापर व्यापक प्रमाणात केला जात आहे. विषाणूचा सामना करण्यासाठी हे यंत्र विकसित करण्याकरिता इतर सहा संघांच्या तंत्रज्ञान विभागाने योगदान दिले आहे. यामध्ये रेड बुल, हास, मॅकलॅरेन, रेनॉ, विलियम्स आणि रेसिंग पॉईंटचा समावेश आहे. एफ-1 ने या प्रकल्पास प्रोजेक्ट पिटलेन असे नाव दिले आहे.
उदाहरणार्थ, मॅकलॅरेनने सांगितले की, या संघाने व्हेंटिलेटर्ससाठी उपकरण उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय या संघाने उत्पादन वाढविण्यात मदत व्हावी म्हणून सर्व पार्ट्सच्या खरेदीसाठी नियोजन, प्रकल्प व्यवस्थापन आणि खरेदी विभागांची स्थापना केली आहे. एफ-1 च्या वतीने सांगण्यात आले आहे की, यापुढेही सर्व संघांकडून त्यांच्या संसाधनांचा वापर करण्याची प्रक्रिया सुरु राहील आणि या महामारीमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये जेथे जलद, अभिनव प्रतिसाद आवश्यक आहे त्यासाठी सहाय्य प्रदान केले जाईल. सीपीएपी यंत्रे सातत्याने हवा-ऑक्सिजन यांचे मिश्रण तोंड आणि नाकावाटे आत सोडतात. यामुळे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत या यंत्रांचा नेहमीच वापर केला जातो. मात्र, सध्या या यंत्रांचा पुरवठा कमी पडत आहे.
ब्रिटनमध्ये कोविड-19 चे 20,000 रुग्ण आढळले असून 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश लोकांमध्ये या नव्या विषाणूमुळे सर्दी खोकल्यासारखी सौम्य लक्षणे आढळून येतात. सुमारे दोन-तीन आठवड्यात ही लक्षणे बरी होतात. काही जणांना, विशेषत: वयोवृद्ध आणि अगोदरपासूनच आजारी असलेल्या व्यक्तींना यामुळे अधिक गंभीर त्रास उद्भवू शकतो. त्यांना न्युमोनिया होऊ शकतो किंवा मृत्यू येऊ शकतो. एफ-1 हंगामास अद्याप सुरुवात झालेली नाही. नियोजित असलेल्या पहिल्या आठ शर्यती पुढे ढकलल्या गेल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजे किमान जूनच्या मध्यापर्यंत शर्यतींना सुरुवात होणार नाही. सध्या एफ-1 मध्ये मर्सिडीझ आघाडीवर असून डिफेंडिंग चॅम्पिअन ल्युईस हॅमिल्टन हा त्यांचा आघाडीचा ड्रायव्हर आहे.
हेही वाचा :कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान काय कराल आणि काय टाळाल!