जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून सर्व देश या जागतिक आपत्तीविरोधात लढा देत आहेत. कोरोना महामारीच्या या काळात भारताने अनेक देशांना सहकार्य केले आहे. कोरोनाविरोधातील भारताच्या प्रयत्नांचे स्वित्झर्लंडने कौतुक केले आहे. प्रसिद्ध स्विस आल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारतीय तिरंगा झळकवत जागतिक आपत्तीविरोधातील भारताच्या कार्याला सलाम केला आहे.
स्वित्झर्लंडने भारतीय तिरंगा मॅटरहॉर्न पर्वतावर लाईट्सच्या मदतीने झळकवला आहे. एका दुसऱ्या देशाने भारतीय तिरंगा झळकवण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वित्झर्लंडमधील भारतीय दुतवासातील अधिकारी गुरलीन कौर यांनी हे फोटो टि्वट करत शेअर केले असून स्वित्झर्लंड प्रशासनाचे आभार मानले आहेत. भारतासोबत एकजूट दाखवण्यासाठी स्विस आलप्सच्या मॅटरहॉर्न पर्वतावर भारताच्या तिरंगाच्या रोषणाई केल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
युरोपामध्ये स्विस आल्प्स पर्वतरांगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे हिमालयाचे महत्त्व आहे, तसेच युरोपात आल्प्सचे महत्त्व असल्याचे म्हटले जाते. आल्प्स ही युरोपामधील एक प्रमुख पर्वतरांग आहे. सुमारे १ हजार २०० किलोमीटर विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन व मोनॅको ह्या देशांमध्ये पसरली आहे. इटलीतील मॉंट ब्लॅंक हे आल्प्समधील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ४ हजार ८०८ मीटर ( १५ हजार ७७४ फुट) इतकी आहे. मॅटरहॉर्न हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.
भारताने कोरोना संकटात सार्कच्या सदस्य देशांना मदत केली आहे. तसेच अमेरिका, ब्राझील आणि इस्रायलसह अनेक देशांमध्ये औषधे पाठविली. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने आपल्या लष्करी आरोग्य कर्मचाऱ्यांना कुवैत आणि मालदीव येथे पाठविले आहे. तसेच भारताने अफगाणिस्तानमध्ये अन्न टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून गव्हाची मदत केली आहे. त्यानंतर आता पुन्हा वैद्यकीय मदत देऊ केली आहे. मित्र देशांना शक्य तेवढी मदत करण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले आहे. यापूर्वी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर पुढाकार घेत सार्क देशांना कोरोनाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. विषाणूविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर आपत्कालीन निधी उभारण्यासही भारताने पुढाकार घेतला होता.