पॅरिस- मागील आठवड्यात फ्रान्सनमधील शार्ली हेब्दो साप्ताहिकाच्या जुन्या कार्यालयाबाहेर चाकू हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज संपूर्ण पॅरिस शहर भीषण स्फोटाच्या आवाजाने हादरले. पॅरिसवर बॉम्ब हल्ला झाल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. मात्र, फायटर जेटचा हा आवाज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, तोपर्यंत हजारो नागरिकांनी आपत्ती निवारण कक्षात फोन केले. संपूर्ण पॅरिस शहर आणि आजूबाजूच्या परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू गेला. त्यामुळे काही काळ नागरिक घाबरून गेले होते.
चाकू हल्ल्यानंतर आज स्फोटाच्या आवाजाने फ्रान्स पुन्हा हादरले - शार्ली हेब्दो
संपूर्ण पॅरिस शहर भीषण स्फोटाच्या आवाजाने हादरले. पॅरिसवर बॉम्ब हल्ला झाल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. मात्र, फायटर जेटचा आवाज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र काढल्यानंतर फ्रान्समधील शार्ली हेब्दो हे साप्ताहिक वादात सापडले आहे. २०१५ साली साप्ताहिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. या खटल्याची सुनावणी नुकतीच सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शार्ली हेब्दो साप्ताहिकाने पुन्हा एकदा प्रेषित मोहम्मदाचे व्यंगचित्र प्रदर्शित केले. त्यानंतर साप्ताहिकाच्या जुन्या कार्यालयाबाहेर मुस्लिम कट्टरतावाद्याने चाकू हल्ला केला. त्यात चार जण जखमी झाले.
शार्ली हेब्दो कार्यालयावरील दहशतवादी हल्ल्याचा खटला सुरू झाल्यानंतर पोलीसही सतर्क झाले आहेत. २०१५ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर साप्ताहिकाने आपले कार्यालय अज्ञात ठिकाणी हलविले आहे. मात्र, मुस्लिम कट्टरतावाद्यांनी जुन्या कार्यालयाच्या परिसराला पुन्हा लक्ष्य केले.