जिनिव्हा - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या निधीवर नियत्रंण आणणार असल्याची धमकी दिली होती. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'वेळ वाया न घालवता जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित करूया. सर्व पक्षांनी विषाणूचा अधिक प्रभावीपणे लढा देण्यासाठी राष्ट्रीय एकता सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करा . राष्ट्रीय ऐक्य हा जागतिक एकतेचा पाया आहे. कोरोनावर राजकारण करणे थांबवा', जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी टि्वट केले आहे.
अमेरिका आणि चीन यांनी एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढले पाहिजे. तसेच जगातील सर्व देशंनी एकत्र येत कोरोनाविरोधात संघर्ष करावा. नेत्यांनी त्यांच्या देशातील लोकांच्या सुरक्षितेतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजेत. आपण आपल्या चुकांमधून शिकून पुढे जायला हवे, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते ट्रम्प...
कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल अशी भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी मिळतो. त्यावर नियंत्रण आणणार असल्याचे ट्रम्प पत्रकारांना म्हणाले. दरम्यान त्यांनी डब्ल्यूएचओला दिला जाणारा निधी कसा रोखणार त्याबद्दल कुठलीही सविस्तर माहिती दिली नव्हती.