हेग ( नेदरलँड ) : युक्रेन विरुद्ध रशियाने छेडले युद्ध तात्काळ थांबविण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेले असून, युक्रेनमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान सद्यस्थितीत घनघोर युद्ध सुरु आहे.
..तर रशिया येणार अडचणीत
रशियाने युक्रेनच्या विरोधात सैन्य कारवाई केली आहे. गेल्या वीस दिवसांपासून मोठे युद्ध सुरु आहे. याविरोधात युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये न्यायालयाने युक्रेनच्या बाजूने निकाल दिला आहे. रशियाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्यात युक्रेनचा पूर्णपणे विजय झाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला हे युद्ध तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार रशियाला हा निर्णय बंधनकारक आहे. रशियाला यावर तात्काळ कारवाई करावी लागेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश न पाळल्यास रशिया आणखीनच अडचणीत येईल अशी प्रतिक्रिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली आहे. युक्रेन आणि रशियाने युद्ध थांबविण्याचा कच्चा आराखडा तयार केला आहे. यामध्ये शस्त्रसंधी करणे आणि रशियाचे सैन्य माघारी घेणे या पर्यायांचा समावेश आहे.
यूक्रेन-रसिया युद्धावर भारताची नजर
दरम्यान, भारताने सोमवारी युक्रेन आणि रशियामधील शत्रुत्व संपवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान थेट संपर्क आणि संवाद साधण्याचे आवाहन केले. यामध्ये आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत आणि पुढेही राहू असे सांगितले. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी उपप्रतिनिधी आर रवींद्र म्हणाले की, भारत संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदा, राज्यांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचा आग्रह धरत आहे. तसेच हे शत्रुत्व त्वरित संपुष्टात आणावे असे आवाहन भारत करत आहे असही ते म्हणाले आहेत.