लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या अमेरिकेच्या निर्णयावर टीका करताना हा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे. ब्लेअर यांनी त्यांच्या संकेतस्थळावरून एक दीर्घ लेख लिहून सैन्य माघारीच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे.
अचानक सैन्य माघारीमुळे तालिबानचा पुन्हा उदय
अफगाणिस्तानातून अचानक आणि गोंधळाच्या स्थितीत सैन्य माघारी घेतल्याने तालिबानला इथे पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली. यामुळे गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानात जे काही मिळविले गेले ते सर्व काही गमवावे लागले. नागरिकांची उंचावलेली जीवनशैली, महिलांचे शिक्षण अशा सर्व प्रकारचे यश यामुळे गमवावे लागले असे ब्लेअर यांनी म्हटले आहे.
अफगाणला वाऱ्यावर सोडणे दुर्दैवी
अफगाणिस्तान आणि तिथल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडणे दुर्दैवी, धोकादायक, अनावश्यक असल्याचे ब्लेअर यांनी म्हटले. हे ना अफगाणिस्तानच्या हिताचे आहे ना आपल्या हिताचे आहे असे ब्लेअर यांनी या लेखात स्पष्टपणे म्हटले आहे. टोनी ब्लेअर हे 1997 ते 2007 अशा दीर्घ कालावधीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान राहिले असून 2003 मधील अमेरिकेच्या नेतृत्वातील इराक युद्धाला ब्लेअर यांनी पाठिंबा दिला होता. 9/11 हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात ब्रिटिश सैन्यही त्यांनी पाठविले होते.