महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'मी मुस्लिम धर्मियांच्या भावना समजतो' जगभरातील आंदोलनानंतर मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया - प्रषित मोहम्मद व्यंगचित्र वाद

मी मुस्लिम धर्मियांच्या भावना समजतो, मात्र, हिंसाचार कदापी सहन केला जाणार नाही, त्यावरील माझे मत ठाम आहे. मुस्लीम मुलतत्ववादाचा मुस्लीम धर्मासह सर्व लोकांना धोका असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन म्हणाले.

एमॅन्युअल मॅक्रॉन
एमॅन्युअल मॅक्रॉन

By

Published : Nov 1, 2020, 7:57 PM IST

Updated : Nov 1, 2020, 9:02 PM IST

पॅरिस - प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रदर्शित केल्यानंतर अनेक देशांमध्ये आंदोलन झाले. या घटनेचे पडसाद भारतातही उमटले. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी यावर पुन्हा वक्तव्य केले आहे. मी मुस्लिम धर्मियांच्या भावना समजतो, मात्र, हिंसाचार कदापी सहन केला जाणार नाही, त्यावरील माझे मत ठाम आहे. मुस्लीम मुलतत्ववादाचा मुस्लीम धर्मासह सर्व लोकांना धोका असल्याचे मॅक्रॉन म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मॅक्रॉन यांनी हे वक्तव्य केले. अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा मी कायमच पुरस्करता आहे. बोलणे, लिहणे, विचार करणे, चित्र रेषाटने याचे देशातील नागरिकांना स्वांतत्र्य हवे, यास माझा पाठिंबा आहे. मी मुस्लिमांच्या भावना समजतो. मात्र, व्यंगचित्रावरून माझ्या वक्तव्याचा आणि भूमिकेचा विपर्यास करण्यात आल्याचे मॅक्रॉन म्हणाले. व्यंगचित्र हे काही सरकारचे नव्हते. ते एका खासगी वृत्तपत्राने काढले असून त्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद

फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला. मुस्लीम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक मुस्लीम देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले.

शार्ली एब्दो मासिकाने काढले होते व्यंगचित्र

शिक्षकांची हत्या केल्यानंतर फ्रान्समधील शार्ली एब्दो या मासिकाने मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रदर्शित केले होते. हे व्यंगचित्र वादात सापडले. अनेक मुस्लिम देशांतून या व्यंगचित्राचा निषेध करण्यात आला होता. तसेच सरकारनेही या कृतीस पाठिंबा दर्शविला होता. प्रेषितांचे व्यंगचित्र काढल्यामुळे २०१५ सालीही शार्ली एब्दो मासिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता.

काय म्हणाले होते फ्रान्सचे राष्टाध्यक्ष ?

व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅक्रॉन यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लीम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लीम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. मॅक्रॉन यांनी व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे समर्थन केले.

फ्रान्समध्ये चाकूहल्ला

फ्रान्समध्ये गुरुवार झालेल्या चाकू हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. देशाच्या दक्षिण भागातील नीस शहरात एका चर्चजवळ ही घटना घडली. फ्रान्समधील शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर काल पुन्हा चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी आहेत का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

Last Updated : Nov 1, 2020, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details