लंडन - स्वीडनची पर्यावरणवादी १७ वर्षीय ग्रेटा थनबर्गन आणि २२ वर्षीय नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजाई यांची प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात मंगळवारी भेट झाली. दोघींनीही ट्विटरवरून भेट झाल्याची माहिती फोटोसह शेअर केली आहे. लेडी मार्गारेट हॉलमध्ये ग्रेटा आली असताना तेथे दोघींची भेट झाली.
ब्रिस्टोल येथे या आठवड्यात होणाऱ्या शाळकरी मुलांच्या आंदोलनात ग्रेटा सहभागी होणार आहे. तर युसूफजाई ऑक्सफर्ड विद्यापीठात राजकारण, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र शिकत आहे. मलालाने 'ती एकमेव मैत्रीण आहे, जिच्यासाठी मी शाळा सोडू शकते', असे ट्विट भेटीनंतर केले आहे. तर ग्रेटाने, अखेर आज मी माझ्या आदर्श व्यक्तीला भेटले, आणखी काय बोलू शकते, असे म्हणत ग्रेटाने भेटीबद्दल माहिती दिली आहे. मात्र, या दोघींमध्ये नेमकी कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली, याची माहिती समजू शकली नाही.
लेडी मार्गारेट हॉलचे प्राचार्य अॅलन रसब्रिगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटाने आपल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी “विज्ञान, मतदान, आंदोलनाच्या मर्यादा, डायवेस्टमेंट इत्यादी विषयांवर संवाद साधला. सर्वांच्या न्याय, सत्य आणि समानतेसाठी उभ्या असलेल्या दोन शक्तिशाली तरुणी, अशा भाषेत येथील व्याख्याते जेनिफर कॅसिडी यांनी दोघींचे कौतुक केले.