फ्रँकफर्ट - दुसरे महायुद्ध संपून आता 75 वर्ष झाली. मात्र, जर्मनीमध्ये अजूनही युद्धकालीन बॉम्ब सापडत आहेत. नुकतेच फ्रँकफर्ट शहरातील कन्वेशन सेंटर येथे बांधकाम सुरु असताना 500 किलो वजनाचा बॉम्ब सापडला आहे. त्याला नष्ट करण्याचे काम आता बॉम्ब नाशक पथकाकडून सुरू करण्यात आले आहे.
या बॉम्बला नष्ट करण्यासाठी पोलीस आणि अग्निशामक दलाने परिसरातील सुमारे 3 हजार नागरिकांना घर सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. या भागातून जाणाऱ्या बस आणि रेल्वेसेवाही थांबविण्यात आल्या आहेत. सर्व परिसराला पोलिसांनी वेढा दिला असून जुनाट बॉम्ब नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज(शुक्रवार) दुपारपर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे काम होईल, अशी आशा प्रशासनाला आहे.