पॅरिस - फ्रान्समधील शिक्षकाची हत्या करण्यापूर्वी त्यांना धमकी दिली होती, असा दावा स्थानिक वृत्तपत्रांनी केला आहे. शाळेतील मुलांना शिकवताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविल्याने पॅरिसजवळ एका शिक्षकाचा अज्ञात व्यक्तीने शिरच्छेद केला होता. हत्या करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव सॅम्युअल पॅटी(४७) असे असून त्यांच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हल्लेखोर १८ वर्षीय चेचेने वंशाचा नागरिक असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे. शिक्षकावर चाकूने हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोराने 'अल्ला हो अकबर' अशी घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.