पॅरिस - मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचे वादग्रस्त ट्विट ट्विटरने काढून टाकले आहे. यानंतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे खाते हटवण्याची मागणी फ्रान्स करत आहे.
मुस्लिमांना संतप्त होण्याचा आणि लाखो फ्रेंच लोकांना मारण्याचा अधिकार आहे, असे वादग्रस्त आणि भयंकर धार्मिक तेढ निर्माण करणारे ट्विट मलेशियाच्या माजी पंतप्रधानांनी गुरुवारी केले होते. मात्र, हे वादग्रस्त ट्विट ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सांगून ट्विटरने ते काढून टाकले आहे.
फ्रान्सचे कनिष्ठ डिजिटल प्रकरण मंत्री सॅड्रिक ओ यांनी गुरुवारी रात्री सांगितले की, त्यांनी फ्रान्समधील ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली आणि महाथिर यांचे अधिकृत खाते त्वरित बंद करण्याची मागणी केली.
'जर तसे झाले नाही तर, ट्विटर त्या हत्यांमध्ये भागीदार होईल,' असे मंत्री सॅड्रिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर म्हणाले.
हेही वाचा -दहशतवादाला तोंड देण्यासाठी नवी रणनीती आखणार; फ्रान्सच्या पंतप्रधानांनी घेतली शपथ
फ्रान्समध्ये 'अल्लाह हू अकबर'च्या घोषणा देणाऱ्या दहशतवाद्याच्या हल्ल्याच्या काही तासांनंतर, महाथिर यांनी अनेक ट्वीट करत पैगंबर मोहम्मद यांच्या चार्ली हेब्दोमधील व्यंगचित्राबाबत मुस्लिमांच्या हिंसक प्रतिक्रियेचे समर्थन केले होते.
'एका संतप्त व्यक्तीने केलेल्या कृत्यासाठी आपण सर्व मुस्लीम आणि मुस्लीम धर्माला दोष दिला आहे. अशा परिस्थितीत फ्रान्समधील लोकांना शिक्षा करण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे. या सर्व वर्षांमध्ये फ्रान्सकडून केल्या गेलेल्या चुकांसाठी फक्त त्यांच्यावर बहिष्कार घालणे पुरेसे नाही,' असे मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर यांनी म्हटले होते. तर, आपल्या बाकीच्या ट्विटसमध्ये त्यांनी पाश्चात्य संस्कृतीबद्दलचा तिरस्कार व्यक्त केला.
हेही वाचा -'लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा मुस्लिमांना अधिकार' व्यंगचित्र वाद पेटला