मॉस्को -कोरोनावरील रशियाने तयार केलेल्या लसींची पहिली बॅच ही पुढील दोन आठवड्यांमध्ये येणार आहे. देशाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने जगातील पहिल्या कोरोना लसीची नोंदणी केली होती. या लसीचे नाव स्पुटनिक-व्ही असे ठेवण्यात आले आहे. गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूशन आणि रशियाचे संरक्षण मंत्रालय यांनी संयुक्तपणे या लसीचे संशोधन केले आहे.
पुढील दोन आठवड्यांमध्ये 'स्पुटनिक-व्ही'ची पहिली बॅच तयार होईल, असे मुराश्को यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. हे लसीकरण ऐच्छिक असणार आहे. काही डॉक्टरांमध्ये अगोदरच कोरोनाविरोधी पेशी तयार झाल्या आहेत. तर, सुमारे २० टक्के डॉक्टर त्यांना या लसीची गरज नसल्याचे म्हणत आहेत. हा पूर्णपणे त्यांचा निर्णय असेल, असे ते म्हणाले.
देशातील लोकांच्या गरजेला प्राधान्य देत, ही लस विदेशामध्ये निर्यातही करण्यात येणार आहे. आम्ही नक्कीच इतर देशांना मदत करु. मात्र, सध्या तरी आम्ही देशातील गरजेवर लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही ते म्हणाले.