रोम -युरोपात कोरोनाने कहर घातला असून लाखो नागरिकांचा जीव गेला आहे. युरोपीयन महासंघातील २७ देशांनी कोरोना लसीकरणासाठी मोठी योजना आखली असून संवेदनशील गटातील जनतेचे लसीकरण सुरू केले आहे. सुमारे ४५ कोटी जनतेचे लसीकरण आधी करण्यात येणार आहे.
संवेदनशील गटातील जनतेला आधी लस -
आरोग्य कर्मचारी, वयोवृद्ध आणि राजकीय नेत्यांना सर्वात प्रथम लस देण्यात येत आहे. रोमानिया देशातील मिहेला अँन्झेल या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला लसीचा पहिला डोस देण्यात आला. लस घेताना काहीच त्रास झाला नसल्याचे तिने सांगितले. जर्मन कंपनी बायोएनटेक आणि फायजर या कंपनीने तयार केलेली लस युरोपीयन युनियनच्या अख्यारित असलेल्या रुग्णालयात येण्यास सुरूवात झाली आहे. शीतगृह कपाटांतून ही लस बेल्जियम येथील कारखान्यातून येत आहे.
युरोपात सुमारे साडेतीन लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू -
युरोपीयन युनियनमधील २७ देशांच्या गटात आत्तापर्यंत १ कोटी ६० लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर ३ लाख ३६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिकांना पुन्हा रुग्णालयात यावे लागणार आहे. लसीकरणाचा हा एक भावनिक क्षण असल्याच्या भावना युरोपीयन कमिशनच्या अध्यक्षा उर्सला लियान यांनी व्यक्त केल्या.