लंडन - पश्चिम इटलीमध्ये असलेल्या पोंपेई या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून आत्तापर्यंत पुरातत्वशास्त्रज्ञ रोमन संस्कृतीचा आणि त्यांच्या नगररचनेचा अभ्यास करत आले आहेत. पोंपेई येथे असणाऱ्या मोजक्या अवशेषांचा अभ्यास करूनच अभ्यासकांना आपले गृहितके सिद्ध करावी लागत होती. मात्र, आता पुरातत्वशास्त्रज्ञांना एक संपूर्ण रोमनकालीन शहरच सापडले आहे.
रडार स्कॅनिंगमध्ये सापडले रोमनकालीन शहर केंब्रिज विद्यापीठ आणि बेल्जियमचे जेंट विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञांना इटलीतील लाझीओ प्रांतात रडार स्कॅनिंगच्या दरम्यान 'फ्लेरी नोवी' या शहराचा शोध लागला आहे. ३० एकर विस्तार असलेले हे शहर इसवी सन पूर्व २४१ मध्ये अस्तित्वात होते.
लाझीओ प्रांतात संशोधनाचे काम करत असताना पोंपेई सारखेच काहीतरी हाती लागेल अशी, अपेक्षा होती. मात्र, स्कॅनिंगनंतर जे संपूर्ण शहराचे अवशेष हाती लागले, ते अकल्पनीय आहे, असे केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक मार्टिन मिलेट यांनी सांगितले.
या संशोधनात पुरातत्वशास्त्रज्ञांनी आधुनिक ग्राऊंड पेनीट्रेटींग रडार(जीपीआर) चा वापर केला. हे रडार विमानाच्या रडार सारखे काम करते. पृष्ठभागाच्या खाली दोन मीटरपर्यंत असलेल्या वस्तूंना या रडारच्या लहरी शोधू शकतात. नव्याने सापडलेल्या या रोमनकालीन शहरात स्नानगृह, बाजारपेठ, मंदिर, एक सार्वजिक सभागृह आणि शहरभर पसलेल्या जलवाहिनीचे अवशेष सापडले आहेत.
पुरातत्वशास्त्रज्ञांना अत्याधुनिक रडार तंत्राचा वापर फायद्याचा ठरू शकतो. मात्र, याला काही अडथळ्यांचाही सामना करावा लागत आहे. सध्या उपलब्ध असलेले तंत्रज्ञान माती आणि चिखलात प्रभावीपणे काम करत नाही. त्यामुळे त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे प्राध्यापक मार्टिन मिलेट यांनी सांगितले.