मॉस्को: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे बुधवारी रात्री रशियामध्ये दाखल झाले. ते तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते शांघाय सहकार संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच, रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत ते द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.
शांघाय सहकार संस्थेचे सदस्य असणाऱ्या आठही देशांचे संरक्षणमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत. प्रादेशिक सुरक्षितता, दहशतवाद अशा विषयांवर या बैठककीदरम्यान चर्चा होणार आहे. शांघाय सहकार संस्थेमध्ये भारत, चीन, कझाकिस्तान, क्रिगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. या संस्थेचे दोन महत्त्वाचे सदस्य - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
चार सप्टेंबरला ही बैठक पार पडणार आहे. याव्यतिरिक्त राजनाथ सिंह हे रशियाचे संरक्षण मंत्री सर्जे शोईजू यांच्यासोबत आणि इतर काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत विविध लष्करी कार्यक्रमांबाबत चर्चा करतील. त्यानंतर ५ सप्टेंबरच्या सायंकाळी ते मायदेशी येण्यासाठी निघतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एससीओच्या बैठकीला चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंघे हेदेखील उपस्थित असणार आहेत. राजनाथ सिंह आणि वेई यांच्यादरम्यान द्विपक्षीय चर्चा होऊ शकते का, असे विचारले असता अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.