अंकारा (तुर्की) - पश्चिम तुर्कीमधील भूकंपातील मृतांचा आकडा 73 पर्यंत वाढला आहे. तुर्की आपत्ती व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. या भूकंपात सुमारे 961 जखमी झाले आहेत. एएफएडीने एका निवेदनात ही माहिती दिली आहे.
शुक्रवारी झाला होता भूकंप
तुर्कीच्या एजियन किनारपट्टीवर आणि ग्रीस बेटावरील सामोसच्या उत्तरेकडे शुक्रवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला होता. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपातची तिव्रता 6.6 रिस्टर स्केल इतकी नोंदवली गेली होती. तर, इतर भूकंपशास्त्र संस्थांनी ती 6.9 असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे तुर्कीमधील तिसर्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या इझमिरमधील इमारती पडल्या आणि सेफेरिहिसार जिल्ह्यात आणि ग्रीक बेटांवर त्सुनामी आली. त्यानंतर शेकडो कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्केही बसले.
मदत आणि बचाव कार्य सुरूच
वेगवेगळ्या संस्थांचे आणि शहरांमधील 5 हजार 500 हून अधिक बचावकर्ते वाचलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी एकत्र काम करत होते. येथे मोठ्या प्रमाणात ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना संवेदनशील हेडफोन्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यावेळी घाबरलेल्या जनतेला नियंत्रित करून शांत करण्याचेही काम या स्वयंसेवकांनी केले.
या कारणाने झाला भूकंप
तुर्कीच्या मधून फॉल्ट लाईन्स (भूकंप रेषा) गेल्या आहेत त्यामुळे येथे भूकंपप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. येथे वारंवार भूकंप होण्याची शक्यता आहे. येथे 1999 मध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी वायव्य तुर्कीमध्ये सुमारे 18,000 लोकांचा बळी घेतला. याशिवाय, ग्रीसमध्येही भूकंप वारंवार होतात.
हेही वाचा -'मी मुस्लिम धर्मियांच्या भावना समजतो' जगभरातील आंदोलनानंतर मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया
हेही वाचा -अमेरिकन अध्यक्षपद निवडणूक : इव्हांका ट्रम्प यांनी वडिलांच्या प्रचारासाठी जमवला 13 दशलक्ष डॉलर्सचा निधी