मॉस्को : जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस असलेल्या 'स्पुटनिक-व्ही'ची मानवी चाचणी सध्या सुरू आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या काही स्वयंसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रशियाच्या एका वृत्तवाहिनीने बुधवारी याबाबत माहिती दिली.
कोरोना लसीच्या मानवी चाचणीवेळी सहभागी स्वयंसेवकांपैकी काही सदस्यांना कोरोनाची लस दिली जाते, आणि बाकी सदस्यांना प्लासेबो दिला जातो. सध्या ज्या स्वयंसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्याला कोरोना लसीचा डोस दिला होता की प्लासेबो याबाबत माहिती समोर आली नाही. याबाबतचा तपास सुरू असल्याचे गामलेया नॅशनल रिसर्च सेंटरचे उपसंचालक डेनिस लॉगुनोव्ह यांनी दिली आहे.
ज्या स्वयंसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे तो कदाचित लसीचा डोस दिलेल्या नाही, तर प्लासेबो दिलेल्या गटातला सदस्य असावा अशी शक्यता रिसर्च सेंटरचे संचालक अॅलेक्झँडर जिन्ट्सबर्ग यांनी व्यक्त केली आहे.
जगातील पहिली कोरोना लस..
११ ऑगस्टला रशियाने 'स्पुटनिक-व्ही'ची जगातील पहिली कोरोना लस म्हणून नोंद केली. सामान्यतः तीन टप्प्यांमधील मानवी चाचण्या पार पडल्यानंतरच लसीची नोंदणी करता येते. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरुही झालेली नसताना रशियाने या लसीची नोंदणी केल्याबद्दल जगभरातून त्यावर टीका केली जात होती.