लंडन : ढगांमधून सौर किरणोत्सर्ग कमी प्रमाणात परावर्तित होत असल्याने येत्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आणखी तीव्र होणार असून यामुळे जागतिक तापमानात तीन अंशांहून अधिक वाढ होण्याचा गंभीर इशारा एका नव्या अभ्यासातून देण्यात आला आहे.
तर 3.2 अंशांनी वाढणार तापमान!
वातावरणातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण दुप्पट झाल्यास जागतिक तापमान सुमारे 3.2 अंशांनी वाढू शकते असे निष्कर्ष या अभ्यासात दिसून आले आहेत. प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकात मंगळवारी हे संशोधन प्रकाशित झाले आहे. ढगांमुळे जागतिक तापमानात दीर्घ कालावधीसाठी वाढ होण्याचे सबळ पुरावे या संशोधनातून समोर आले आहेत. इम्पेरिकल कॉलेज ऑफ लंडन आणि ईस्ट अँग्लिया विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
कार्बन ऊत्सर्जन कमी करणे गरजेचे
पृथ्वीवरील ढगांच्या आवरणाच्या उपग्रह मोजणीचे विश्लेषण करण्यासाठी एक नवी पद्धत या संशोधकांनी शोधून काढली आहे. प्री-इंडस्ट्रियल कार्बनडायऑक्साईची पातळी ही 280 पीपीएम इतकी असते. मात्र सध्या ही पातळी 420 पीपीएमपर्यंत जात आहे. जर अजुनही कार्बन ऊत्सर्जनावर नियंत्रण मिळविले नाही तर ही पातळी या शतकाच्या मध्यापर्यंत दुपटीने वाढण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. प्री-इंडस्ट्रीयल कार्बनडायऑक्साईडच्या दुपटीवरून तापमान वाढीचा अंदाज वर्तविण्यास क्लायमेट सेन्सिटिव्हिटी असे संबोधले जाते. वातावरणातील बदलांना हवामानाकडून किती तीव्र प्रतिसाद मिळतो हे यावरून मोजले जाते.
हवामान संवेदनशीलतेविषयी भाकित वर्तविणे अत्याधिक अनिश्चित
हवामानाच्या संवेदनशीलतेविषयी भाकित करण्यात सर्वात अनिश्चित घटक म्हणजे ढगांचा परिणाम आणि भविष्यातील त्यांच्यातील बदल हे आहेत असे संशोधक म्हणाले. ढगांची घनता, उंची या घटकांवर त्यांचा वातावरणातील परिणाम अवलंबून असतो. यामुळे तापमान वाढू शकते किंवा कमी होऊ शकते असे संशोधक म्हणाले. हवामान संवेदनशीलता ही अतिशय अनिश्चित असून यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या भविष्यातील भाकितांविषयीची अनिश्चितताही वाढते असे या संशोधनातील सहअभ्यासक पॉलो सेप्पी म्हणाले. तर ढग हे ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील असे पुरावे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात समोर आले आहे असे या संशोधनातील सहअभ्यासक पीर नोवॉक म्हणाले. ढगांचा भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगवर कसा परीणाम होऊ शकतो याची अचूक मोजदाद करणे अतिशय गरजेचे आहे. या अभ्यासातील निष्कर्षांमुळे आम्ही अतिशय आत्मविश्वासाने हवामानातील बदलांचे भाकित वर्तवू शकतो आणि भविष्यातील हवामान बदलांविषयी अधिक सुस्पष्ट चित्र आपल्याला मिळू शकते असे सेप्पी म्हणाले.
कमी उंचीवरील ढगांमुळे कूलिंग, जास्त उंचीवरील ढगांमुळे हिटींग इफेक्ट
कमी उंचीवरील ढगांमुळे कूलिंग इफेक्ट वाढतो कारण हे ढग सूर्यकिरण जमीनीवर पडण्यात अडसर आणतात असे संशोधकांनी अधोरेखित केले आहे. तर जास्त उंचीवरील ढगांमुळे तापमान वाढते, कारण त्यांच्यामुळे जास्त सौर ऊर्जा जमीनीपर्यंत पोहोचते असेही संशोधक म्हणाले. ही ऊर्जा ढगांमध्ये अडकून हरीतगृह परिणाम वाढतो. त्यामुळे अशा ढगांमुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर पडू शकते असे संशोधक म्हणाले.
हेही वाचा -इराक : ईदची खरेदी सुरू असतानाच बगदादमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, 25 ठार