लंडन - जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अमेरिकेत पोलीस कारवाईदरम्यान मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली आहेत. लंडनमध्ये पोलीस आणि प्रशासनाविरोधात तेथील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लंडनमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला असून त्यात पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले आहेत.
जॉर्ज फ्लॉईड मृत्यू प्रकरण : लंडनमध्ये आंदोलक अन् पोलिसांमध्ये संघर्ष उफाळला - Black Lives Matter' protest in London
अमेरिकेत पोलिसांच्या कारवाईत ४६ वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लंडनमध्येही नागरिकांनी आंदोलन केले
आंदोलकांमधील काही जणांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यालयाच्या अगदी जवळ असलेल्या मार्गावर तैनात पोलिसांवर वस्तू फेकल्या. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. तत्पूर्वी, काही आंदोलक अमेरिकेच्या दूतावासासमोर निर्दशन करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. तेव्हाही पोलीस व आंदोलक यांच्यात हाणामारी झाली होती.
कोरोना महामारीची स्थिती पाहता, संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने आंदोलनासाठी लोकांनी एकत्र येण्याचे टाळावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. आंदोलकांमधील काहीजण मुद्दाम हिंसाचार घडवत असल्याचे पोलिसांच्या संकेतस्थळावरील निवेदनात म्हटले आहे.