लंडन -इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशभरात एका महिन्याचे 'संपूर्ण लॉकडाऊन' घोषित केले आहे. 2 डिसेंबरपर्यंत याचा कालावधी असणार आहे. मागील तीन महिन्यांपासून युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. काही दिवसांपासून युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तसेच काही ठिकाणी एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
स्पेनमध्येही 'लॉकडाऊन'
जर्मनी, स्पेन यांसारख्या देशांमध्येही कोरोनाचा पुन्हा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. स्पेनच्या मॅद्रिद या शहरातही अशाच प्रकारे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच पोर्तुगालमध्येही नव्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नव्या नियमांसह त्याची अंमलबजावणी 4 नोव्हेंबरपासून होणार आहे. युरोपातील अन्य काही देशांमध्येही याच प्रमाणे पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यासंंबंधी चर्चा सुरू आहेत. कोरोनाची लस येण्यास अद्याप बराच कालावधी लागणार आहे. लशीसंदर्भातील अनिश्चितता अद्याप कायम आहे. तोपर्यंत ठिकठिकाणी समांतर लसीकरण तसेच पर्यायी औषधांवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच कोरोनाची लाट पुन्हा आल्यास येणारा काळ आव्हानात्मक असणार आहे.
जगभरात कोरोनाची दुसरी लाट?
युरोपीय देशांमध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये काही रुग्णांना एकदा बाधा झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातूनच हा विषाणू म्युटेट (विकसित रुप) होत असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून भारताच्या तुलनेत पश्चिमी देशांमध्ये मृत्यूदर अधिक होता. तसेच युरोपातही बळी जाणाऱ्यांची संख्या स्थानिक लोकसंख्येच्या जास्त प्रमाणात होती. यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.