लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारी पार पडलेल्या विश्वासदर्शक ठरावात निसटता विजय मिळवला. गेल्या २४ तासात ब्रिटनच्या संसदेत वेगाने घडामोडी होत आहेत. संसदेने मंगळवारी ब्रेक्सिटचा करार ४३२ - २०२ अशा मताधिक्याने फेटाळल्याने पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, बुधवारचा विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने पदावरून पायउतार होण्याची त्यांच्यावरील नामुष्की काही काळापुरती का होईना टळली आहे.
ब्रिटनच्या इतिहासात गेल्या २६ वर्षात संसदेत पहिल्यांदाच पार पडलेला अविश्वास ठराव ३२५ - ३०६ अशा मताधिक्याने जिंकल्यानंतर थेरेसा मे यांनी नव्या ब्रेक्सिट कराराची बोलणी करण्यासाठी तातडीने विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलणी सुरू केली आहेत. २९ मार्च रोजी इंग्लड युरोपातून वेगळे होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्वांच्या एकमताने हा करार पुढे नेणे आवश्यक असून विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मे यांनी केले आहे. ब्रेक्सिटला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या कराराची तारीख लांबण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.