जिनेव्हा -चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा एक हजांराच्याही वर गेला आहे. पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूला 'कोविड 19' (COVID-१९) हे एक अधिकृत नाव दिले आहे.
कोरोना विषाणूच्या नावाची व्याख्या करण्यात आली. त्यानुसार हे नवे नाव देण्यात आले आहे. को म्हणजे कोरोना, वि म्हणजे व्हायरस तर डी म्हणजे डिसीज अशी व्याख्या करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रीयसस यांनी याबाबतची माहिती दिली.
कोरोना विषाणूची लागण ४२ हजार नागरिकांना झाली असून मृत्यूचा आकडा १ हजार १४० वर गेला आहे. चीनबाहेर २४ देशांमधील ३९३ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. चीनबाहेर कोराना विषाणू संसर्गामुळे दोन बळी गेले आहेत. त्यातील एक बळी हाँगकाँगमध्ये आणि दुसरा फिलिपाईन्समध्ये गेला आहे. तसेच २४ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतानेही हुबेई प्रांतात अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढले आहे. मात्र, अजूनही बरेचजण तेथे अडकून पडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.