मार्टीग्युएस (फ्रान्स) - मार्सेले प्रांतात भूमध्य वाऱ्यांमुळे लागलेल्या आगीत 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आतापर्यंत 2700 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. फ्री-वे जवळ आग लागल्याने काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत.
मार्टीग्युएस शहरात लागलेली आग विझविण्यासाठी जवळपास 1800 अग्नीशमन दलाचे कर्मचारी, आग विझविण्यासाठीची यंत्रणा तसेच हेलिकॉप्टर्स आणि शीघ्र कृती दलासह घटनास्थळी रवाना झाले आहेत. गेल्या चौदा तासांपासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भागात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने आग विस्तृत परिसरात पसरली आहे. तसेच भूमध्य सागरावरून वाहणाऱ्यांमुळे आग पसरायला हातभार लागत आहे. घटनास्थळावरून समुद्र 8 किमी अंतरावर असल्याने काही ठिकाणी नागरी वस्ती आहे. संंबंधित परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. मात्र, अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे.