वुहान - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असे वाटत असतानाच आता चीनमधूनच पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाबाधित आढळत आहेत. यातच चीन सरकारने वुहानधील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची योजना आखल्याची माहिती आहे.
चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे केंद्रस्थान असलेल्या वुहान शहराची लोकसंख्या 11 दशलक्ष आहे. 11 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहरातील सर्वांच्या चाचण्या घेण्याच्या विचार चीन सरकारने केला आहे. याबाबत दहा दिवसांची चाचणी योजना तयार करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहेत.
आपल्या जिल्ह्यातील लोकसंख्या, तेथील कोरोना उद्रेकाचे प्रमाण, यावर आधारित आपली स्वतःची योजना तयार करण्याची जबाबदारी जिल्हा प्रमुखावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान संपूर्ण शहराची चाचणी करणे अशक्य आणि महागडी असल्याचे मत वरिष्ठ आरोग्य अधिका्यांनी व्यक्त केले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 84 हजार 11 कोरोनाबाधित असून 4 हजार 637 लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटी कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा वुहान शहरातील प्रशासनाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. उलट खोटी माहिती पसरवत असल्यावरून डॉक्टरांना तंबी दिली. पुढे जेव्हा चीनमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त झाला, या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या मृत्यूनंतर चीनमध्ये संतापाची लाट पसरली होती.मात्र, कोरोना चीनमधून आला यास पुरावे नसल्याचे चीनने म्हटले आहे.