इस्लामाबाद -पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय हवाई दलाचे जवान अभिनंदन वर्धमान आज मायदेशात परतणार आहेत. याबद्दलची घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत केली. भारतीय वैमानिकास पाकिस्तानने तात्काळ मुक्त करावे. मात्र, त्यासाठी भारत कोणत्याही प्रकारचा तह पाकिस्तानशी करणार नाही, असा सूचक इशारा भारताने दिल्यानंतर पाकिस्तानला नमावे लागले आहे.
पाकिस्तानकडून अभिनंदन यांना सोडणे आमचे शांततेच्या दृष्टीने पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अमेरीका, फ्रान्स, ब्रिटन, सौदी अरेबिया या देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला भारतीय वैमानिकाची सुटका करणे भाग पडल्याचे बोलले जात आहे.
दोन्ही देशातील संबंध सुधारणार असतील तर आम्ही भारताच्या वैमानिकास सोडण्याचा विचार करणार, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर भारताने संतप्त प्रतिक्रीया दिली. पाकिस्तानने वैमानिकास त्वरीत मुक्त करावे. मात्र, या बदल्यात आपण असा कोणताही करार करणार नाही ज्यामुळे दहशतवादविरोधी कामगिरी कमकूवत होईल, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली. यानंतर पुढच्या परिणामांची दक्षता घेत पाकिस्तनने हा निर्णय घेतला. शिवाय भारताकडून पुढील काळातही पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात येणार असल्याचे भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.