नवी दिल्ली- कोरोना महामारी जगभरात कशी पसरली? विषाणूचा नक्की उगम कोठून झाला? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनमधील वुहानमध्ये गेले आहे. येथे पथकाने पहिला कोरोनाचा रुग्ण ज्या रुग्णालयात दाखल केला, त्या रुग्णालयला भेट देऊन तपास केला. सुमारे एक वर्षापूर्वी या रुग्णालयात पहिला रुग्ण दाखल झाला होता. मात्र, आता आरोग्य पथकाकडून बारकावे, तथ्य शोधण्यात येत आहेत.
मांस बाजाराला पथकाची भेट -
हुबेई प्रोव्हेन्शिअल रुग्णालयाला जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. सोबतच शहरातील विविध भागांना भेटी देवून विषाणूच्या उगमाचा धांडोळा घेतला. हुबेई येथील मांस बाजारातून कोरोना विषाणूचा उगम झाला, असे समजले जाते. मात्र, यात वैज्ञानिक पुरावा नाही. डब्ल्यूएचओच्या अभ्यासातून विषाणूबाबातची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मांस बाजार, वुहान विषाणू प्रयोगशाळेलाही अधिकारी भेट देणार आहेत.
महामारी नीट हाताळली नसल्याचा चीनवर आरोप
कोरोना विषाणू सर्वप्रथम आढळल्यानंतर चीनने महामारीची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. चीनने जर कडक निर्बंध लादले असते तर विषाणू दुसऱ्या देशात पोहचला नसता. या उलट चीनने स्थानिक डॉक्टरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीच्या काळात चीनने विषाणूच्या उगमाचा तपास करण्यास नकार दिला होता.