महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेचे संरक्षण, परराष्ट्र सचिव भारत दौऱ्यावर; चीनचा जळफळाट

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन दंड थोपटून उभा आहे. त्यास अमेरिकेने शह दिला आहे. लडाख सीमावादानंतर भारत चीनमध्येही शत्रूत्व निर्माण झाले असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका बैठकीला महत्त्व आले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 25, 2020, 9:57 PM IST

नवी दिल्ली -अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ आणि संरक्षण सचिव मार्क एस्पर सोमवारी भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री स्तरावर महत्त्वाची बैठक होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना दोन्ही देशात सुरक्षा विषयक महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा होणार आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम लावण्यासाठी दोन्ही देशांतील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

मंगळवारी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीत सहभागी होणार आहेत. प्रादेशिक, द्विपक्षीय, आंतररष्ट्रीय सुरक्षसेसह इतर विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन दंड थोपटून उभा आहे. त्यास अमेरिकेने शह दिला आहे. लडाख सीमावादानंतर भारत चीनमध्येही शत्रूत्व निर्माण झाले असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत अमेरिका बैठकीला महत्त्व आले आहे.

भारत अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी BECA (बेसिक एक्सचेंज अ‌ॅन्ड को-ऑपरेशन अ‌ॅग्रीमेंट) या रखडलेल्या करारावर सह्या होण्याची शक्यता आहे. सुरक्षेसंबंधी माहिती, अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान, जीपीएस माहिती अमेरिकेकडून भारताला हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या युद्ध सज्जतेत वाढ होणार आहे.

चीन अमेरिका वादातील महत्त्वाचे मुद्दे

हाँगकाँगवासियांची गळचेपी, तैवान, कोरोना, व्यापार, दक्षिण चिनी समुद्रातील चीनची दादागिरी, पेटंट चोरी, उईघुर मुस्लिमांना चीनकडून मिळणारी हीन वागणूक या विरोधात अमेरिकेने चीनविरोधात आघाडी उघडली आहे. मात्र, चीननेही अमेरिका विरोधात कारवाया सुरू केल्या आहेत. पॅसिफिक समुद्रात चिनी नौदलाला रोखण्यासाठी अमेरिकेने मोठा लष्करी ताफा तैनात केला आहे.

चीनच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी अमेरिकेची भारताशी जवळीक

२७ ऑक्टोबरला भारत आणि अमेरिकेत वरिष्ठ स्तरावर राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी महत्त्वाची बैठक होणार आहे. परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री स्तरावरील ही बैठक होणार असून २+२ मंत्री स्तरावरील बैठक, असे नाव यास देण्यात आले आहे. आशिया खंडात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी अमेरिकेने भारताशी जवळीक साधली आहे. या बैठकीत अमेरिका भारतासोबत सॅटेलाईट माहितीचे आदानप्रदान करण्यास सहकार्य करार करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे भारताची क्षेपणास्त्र आणि बॉम्ब डागण्याची अचूकता वाढेल, असे बोलले जात आहे.

भारत अमेरिका सुरक्षा मुद्दे

संरक्षण साहित्य विक्री, सुरक्षा विषयक माहितीचे आदानप्रदान आणि लष्करी सराव करण्यातही अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. या सर्व क्षेत्रात अमेरिका भारताशी सहकार्य करत असून फक्त हिमालय क्षेत्रातील वादावर लक्ष्य केंद्रित केले नाही, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने नुकतेच सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details