वॉशिंग्टन -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारतात असणार आहेत. दिल्ली आणि अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प देखील भारत-भेटीसाठी उत्सुक आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावरून एक मजेशीर व्हिडिओ टि्वट केला. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मिम तयार करण्यात आले आहे.
दक्षिण अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटामधील एका दृश्यावर हे मिम तयार करण्यात आले आहे. यामध्ये ट्रम्प हे स्वत: बाहुबलीच्या भुमिकेत दिसत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई कुशन देखील पाहायला मिळत आहेत.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प, आणि देशाच्या प्रथम महिला मेलियाना ट्रम्प हे अँड्र्यूजमधील हवाई दलाच्या तळावरून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४.२५ च्या सुमारास ते जर्मनीला पोहोचतील. तेथे एक थांबा घेऊन, ते अहमदाबादसाठी रवाना होतील. यामध्ये ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाला हजेरी लावतील. तसेच, साबरमती आश्रम आणि ताजमहालालाही भेट देतील. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारत दौऱ्यावर असतील.
ट्रम्प यांची भारतभेट जगाच्या नजरेत भरण्याच्या दृष्टीने आणि राजकीय रेट्यासाठी महत्वाची ठरणार आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. यापूर्वी २०१९ या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन समारंभास ट्रम्प यांना भारताने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले होते, पण व्हाईट हाऊसने नंतर हे निमंत्रण अध्यक्षांच्या राष्ट्राला उद्देश्यून करावयाच्या भाषणाची तारीख एकच येत असल्याचे कारण सांगत नाकारले होते.