काबूल -अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर देशात अस्थिरता पसरली आहे. अफगाणिस्तानमध्ये अन्न-धान्य महाग झाले आहे. अत्यावश्यक वस्तूंचा किंमती गगनाला भिडल्या आहेत. अफगाण अर्थव्यवस्था ढासळत असून त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. इतर देशांकडून अफगाणिस्तानला मदत मिळण्याची शक्यता क्षीण आहे. अशा अवस्थेत तालिबानसमोर मोठे आव्हान आहे. तालिबानी नेता मुल्ला बरादर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या मानवी मुल्यांसंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे अवर महासचिव मार्टिन ग्रिफिथ्स यांची भेट घेतली. या भेटीनंतर संयुक्त राष्ट्राचे सूर बदलले पाहायला मिळाले.
मार्टिन ग्रिफिथ्स यांनी टि्वट करून अफगाणिस्तनाला समर्थन आणि निष्पक्ष मानवीय मदत करत राहणार असल्याचे सांगितले. गरजू लोकांना मदत आणि सुरक्षा पुरवण्यासाठी संयुक्त राष्ट्र बांधील असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी सर्वांना महिला आणि अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. ग्रिफिथ्स यांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांप्रती एकजुटता व्यक्त केली. येत्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा तालिबान आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे.
याआधी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 13 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानसाठी उच्चस्तरीय मानवतावादी परिषद बोलावली आहे. गुटेरेस यांनी अफगाणिस्तानमधील मानवतावादी , आर्थिक संकटाबद्दल आणि मूलभूत सेवा पूर्णपणे कोलमडण्याच्या धोक्याबद्दल आपली चिंता व्यक्त केली होती.