न्युयॉर्क - चीनमधील मुस्लीमबहुल झिंजियांग प्रांतात सरकारकडून स्थानिकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या माध्यमांतून पुन्हा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या भागाला मानवाधिकारी आयोगाला भेट देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राने केली आहे. चीनने झिंजियांग प्रांतात उईघुर समाजाच्या नागरिकांसाठी शैक्षणिक कॅम्प उभारले आहेत. मात्र, या ठिकाणी महिलांवर पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक बलात्कार होत असल्याच्या बातम्या ब्रिटिश माध्यमांनी दिल्यानंतर गदारोळ उठला आहे. सुमारे दहा लाख नागरिकांना चीनने नजरकैदेत ठेवल्याचा आरोप चीनवर जगभरातून होत आहे.
स्थानिकांचा आवाज दाबण्याचा चीनकडून प्रयत्न -
चीनच्या अति पश्चिमेकडे झिंजियांग प्रांत आहे. येथे उईघुर ही मुस्लीम जमात राहते. या भागात चिनी सराकर विरोधात कायमच बंड होते. तसेच चीनपासून स्वातंत्र्य मिळावे अशी मागणीही येथील लोकांची आहे. मात्र, चीनकडून येथील नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. चीनने या भागात कॅम्पची उभारणी केली आहे. या कॅम्पमधून आम्ही तरुण, महिला, मुलांना प्रशिक्षण देत अल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, येथे उईघुर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे पुरावे हाती लागले आहेत.
अमेरिकेनेही व्यक्त केली चिंता -
संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टेफनी डुजारिक यांनी यााबबत अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. झिंजियांग प्रांतात महिलांवर अत्याचार होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तेथे मानवाधिकार आयोगाने जाऊन परिस्थितीची पाहणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे डुजारीक यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी चीनने अत्याचार होत असल्याच्या आरोपांना फेटाळून लावले आहे.