लाहोर -पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तान सरकारने फरार घोषित केले आहे. नवाज शरीफ यांच्या प्रत्यार्पणाची मागणी पाकिस्तान सरकारने युके सरकारकडे केली आहे. ' पाकिस्तान सरकार नवाज शरीफ यांना फरार आरोपीप्रमाणे हाताळणार आहे. त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती युके सरकारला करण्यात आली आहे', असे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.
नवाज शरीफ यांच्या प्रत्यार्पणासाठी पाकिस्तानचे प्रयत्न
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तान सरकारने फरार घोषित केले आहे. नवाज शरीफ यांच्या प्रत्यार्पणाची मागणी पाकिस्तान सरकारने युके सरकारला केली आहे.
नवाज शरीफ यांना लंडनमधील रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचे असे राजरोसपणे रस्त्यांवर फिरणे, म्हणजे न्यायपालिकेचा अपमान आहे. पाकिस्तान सरकार असे होऊ देणार नाही. यामध्ये वैयक्तिक पातळीवर कुठलाही आकस नसून आम्ही फक्त कायद्याची अंमलबजावणी करत आहोत, असे पाकिस्तानी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
दरम्यान, लाहोर उच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना 29 ऑक्टोबर 2019 ला उपचारासाठी 8 आठवड्यांचा जामीन दिला होता. 19 नोव्हेंबरला नवाज शरीफ उपचारासाठी लंडनला गेले होते. त्यानंतर जामिनाची मुदत संपल्यानंतरही ते पाकिस्तानला परतले नाहीत. त्यावर इम्रान खान यांनी कॅबिनेट बैठकीत शरीफ यांना फरार घोषित केले. शरीफ यांनी जामिनासाठी असलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याचेदेखील पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे.