टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतावर पदकांचा वर्षाव होत आहे. आज समारोपाच्या दिवशी पुन्हा भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदकं पटकावलं आहे. कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तर सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकले. पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने एकूणच 19 पदके जिंकली आहेत. यात 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकं आहेत.
पुरुष एकेरी SH6 बॅडमिंटन स्पर्धेत कृष्णा नागरने सुवर्णभेद करत हाँगकाँगच्या शू मान कायशीचा पराभव केला. कृष्णा नगरने सामन्यादरम्यान चमकदार कामगिरी करत 21-17, 16-21 आणि 21-17 ने सामना जिंकला. हा सामना 43 मिनिटे चालला. कृष्णाने उपांत्य फेरीत ब्रिटनच्या क्रिस्टन कॉम्ब्सचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृष्णा नागरचे कौतूक केले असून त्याचे अभिनंदन केले.
कर्नाटकमध्ये जन्म झालेला सुहास यथिराज पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले आहेत. सुहास हे नॉएडा येथील गौतम बुद्धनगर येथे जिल्हाधिकारी आहेत. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटीवनचा 21-9, 21-15 असा अवघ्या 31 मिनिटांत पराभव केला होता. अंतिम फेरीत सुहास यांच्यासमोर फ्रान्सच्या अव्वल मानांकित लुकास माझूरचे आव्हान होते. लुकास माझूरने सुहास यथिराजचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. तर सुहास यथिराजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
सुहास यथिराजने रौप्य पदक जिंकल्याबद्दल पत्नी रितू यांनी देखील आनंद व्यक्त केला. हा खूप चांगला खेळलेला सामना होता. मला त्याचा अभिमान आहे. हा गेल्या सहा वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुहासचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
हेही वाचा -टोकियो पॅराऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात भारतीय संघाची ध्वजवाहक असणार 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा