महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Afghanistan : काबूलपासून फक्त काही अंतरावर तालिबान; अफगाणिस्तानात अराजकता - Taliban in Afghanistan

अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली आहे. देशातील निम्म्या प्रांतीय राजधान्या तालिबानच्या ताब्यात गेल्या आहेत. सध्या अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात काबूल, मझार ए शरिफ, जलालाबाद ही शहरे आहेत. ज्या वेगाने तालिबान शहरे ताब्यात घेत आहे, हे लक्षात घेतले असता, काहीच दिवसात काबूल राजधानी सुद्धा तालिबानच्या ताब्यात जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Afghanistan
अफगाणिस्तान

By

Published : Aug 14, 2021, 9:36 AM IST

काबूल - अफगाणिस्तानमध्ये पूर्वीपेक्षा अधिक तालिबानी ताकद वाढली आहे. अमेरिकेतील सैन्यांनी अफगाणिस्तान सोडल्यानंतर देशातील निम्म्या प्रांतीय राजधान्या तालिबानने ताब्यात घेतल्या आहेत. यात कंदाहार आणि हेरात या दोन महत्वाच्या शहरांचाही समावेश आहे. आतापर्यंत तालिबानच्या हाती अफगाणिस्तानातील 34 प्रांतांपैकी 18 प्रांतांच्या राजधान्या आल्या आहेत. सध्या अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात काबूल, मझार ए शरिफ, जलालाबाद ही शहरे आहेत. तालिबान राजधानीपासून 80 किलोमीटर (50 मैल) अंतरावर असलेल्या लोगार प्रांतात सरकारी सैन्याशी लढत आहे. ज्या वेगाने तालिबान शहरे ताब्यात घेत आहे, हे लक्षात घेतले असता, काहीच दिवसात काबूल राजधानी सुद्धा तालिबानच्या ताब्यात जाईल, असेही तज्ञांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तान सरकार तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभा राहील, असे अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या विरोधात आपला लढा सुरूच ठेवेल आणि अफगाणिस्तान सैन्य आणि सार्वजनिक उठाव शक्तींना पाठिंबा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे अफगाणिस्तानचे प्रथम उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी म्हटले आहे. तर अफगाणिस्तान सरकारने समर्पण करावे, त्यांना माफ करण्यात येईल, असे तालिबानने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.

अफगाणिस्तान सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशावर ही वेळ आली असल्याचे काही नेत्यांनी आणि कायदे तज्ञांनी म्हटलं आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भंयकर स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास 400,000 नागरिकांना त्यांचे घर-दार सोडावे लागले आहे. यातील काही जणांनी काबूलमध्ये आश्रय घेतला आहे. राजधानी काबूल तालिबानच्या ताब्यातून वाचवली जाईल, अशी आशा त्यांना आहे.

देशांची दूतावास सोडण्याची तयारी -

तालिबान राजधानी काबूलवर हल्ल्याच्या तयारीत आहेत. काबूलमध्ये अमेरिकेसह अनेक देशांची दूतावास कार्यालये आहेत. अशा परिस्थितीत अनेक देशांनी दूतावास सोडण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना युद्धग्रस्त देश त्वरित सोडण्यास सांगितले आहे. तर अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपल्या दूतावासातील कर्मचारी नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी 3 हजार सैन्य पाठवले आहे. तर ब्रिटननेदेखील 600 कमांडो अफगाणिस्तानमध्ये पाठवले आहे. अफगाणिस्तानमधून ब्रिटीश नागरीक, कर्मचारी, अधिकारी यांना पुन्हा सुखरुप मायदेशी आणण्यासाठी 600 कमांडोचे एक पथक पाठवण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र प्रमुखांचे तालिबानला आक्रमकता थांबवण्याचे आवाहन -

संयुक्त राष्ट्राने अफागाणिस्तानच्या शेजारी देशांना आपल्या सीमा खुल्या ठेवण्याचा आग्रह केला आहे. गेल्या एका महिन्यात 1 हजारापेक्षा जास्त सामान्य नागरिकांचा मृत्य झाल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. तालिबानने गेल्या काही दिवसात पत्रकार आणि अनेक राजकीय नेत्यांच्या हत्या केल्या आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमधील आपले आक्रमण त्वरित थांबवावे आणि दीर्घकालीन गृहयुद्ध टाळण्यासाठी सद्भावनेने वाटाघाटी करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी केले. तालिबान त्यांच्या नियंत्रणाखाली आलेल्या भागात विशेषतः महिला आणि पत्रकारांना लक्ष्य करत आहे. या सर्व घटनांनी आपण व्यथित झाल्याचे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले.

कॅनडाकडून 20,000 हून अधिक असुरक्षित अफगाण निर्वासितांचे स्वागत

20,000 हून अधिक असुरक्षित अफगाण निर्वासितांचे स्वागत करण्यासाठी कॅनडा आपल्या पूर्वीच्या विशेष इमिग्रेशन कार्यक्रमाची निर्मिती करणार आहे. कॅनडाचे प्रयत्न विशेषतः असुरक्षित असलेल्यांसाठी असतील. ज्यात महिलांचा समावेश आहे. ही माहिती कॅनडाचे इमिग्रेशन शरणार्थी आणि नागरिकत्व मंत्री मार्को मेंडिसिनो यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा -कंदाहार, हेरातवर तालिबानचा ताबा; दोन तृतीयांश अफगाणिस्तान सरकारच्या हातातून निसटले!

हेही वाचा -तालिबानी दहशतावाद्यांचा पराभव करण्याकरिता अफगाण सरकारने 'हा' आखला प्लॅन

हेही वाचा -"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका

हेही वाचा -पुलित्झर पुरस्कार प्राप्त भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात ठार

ABOUT THE AUTHOR

...view details