काबूल - तालिबानने ३ भारतीय अभियंत्यांची सुटका केल्याची माहिती दिली आहे. मात्र, याबदल्यात त्यांनी त्यांच्या संघटनेच्या ११ दहशतवाद्यांची सुटकाही करून घेतली आहे. यापैकी काही जण या संघटनेतील वरच्या पदावरील दहशतवादी सदस्य आहेत. तालिबानचा माजी कमांडर सयेद मोहम्मद अकबर आघा याने ही माहिती दिली.
या अभियंत्यांना एका वर्षाहून अधिक काळ उत्तर अफगाणिस्तानातील बाघलान येथे ओलीस ठेवण्यात आले होते. आघा याने दिलेली माहिती येथील स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. रविवारी एका अज्ञात स्थळी हे अभियंते आणि दहशतवाद्यांना परस्परांकडे सोपवण्यात आले, असे आघा याने म्हटले आहे.
अमेरिकेचे शांतीदूत झालमे खलिलझाद यांनी तालिबानचा वरच्या पदावरील मध्यस्थ मुल्ला अब्दुल गणी बरदार याची भेट घेतल्यानंतर काही कालावधीतच ही घटना घडून आली. बरदार हा तालिबानी चळवळीचा सहसंस्थापक आणि मागील आठवड्यात इस्लामाबादला भेट दिलेल्या तालिबानच्या प्रतिनिधिमंडळाचा प्रमुख होता.
हेही वाचा - इराकमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी माध्यम कार्यालयांवर केले हल्ले