इस्लामाबाद -तालिबानचा माजी प्रवक्ता असलेला एहसानुल्लाह एहसान हा पाकिस्तानच्या तुरुंगातून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१२ मध्ये मलाला युसूफजाई या विद्यार्थिनीवर झालेला गोळाबार, आणि २०१४ मध्ये पेशावर लष्करी शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला या दोन्हीसाठी एहसान जबाबदार होता.
एहसान याने गुरुवारी आपली एक ध्वनीफीत प्रसिद्ध केली. यामध्ये त्याने आपण ११ जानेवारीलाच पाकिस्तानमधील तुरुंगातून पळून गेल्याचे सांगितले आहे. २०१७ साली त्याने पाकिस्तानी लष्कारासमोर समर्पण केले होते. यावेळी लष्काराने आपल्याला दिलेली आश्वासने पाळली नसल्याने आपण पळून गेलो असल्याचे तो सांगत आहे.
या ध्वनीफितीची सत्यता तपासण्यात आली नाहीये, तसेच पाकिस्तान सरकार आणि लष्करही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देत नाहीये. या ध्वनीफितीमध्ये त्याने आपण सध्या कुठे आहे हे सांगितले नसले, तरी आपण आपल्या तुरुंगातील दिवसांबाबत आणि भविष्यातील योजनांबाबत लवकरच माहिती देणार असल्याचे म्हटले आहे.
आतापर्यंतची सर्वात कमी वयाची नोबेल विजेती असलेल्या मलालावर, पाकिस्तानमधील महिलांच्या शिक्षणासाठी मोहीम राबवल्याबद्दल त्याने २०१२ मध्ये गोळ्या झाडल्या होत्या. तर, २०१४ च्या डिसेंबरमध्ये पेशावर येथील लष्करी शाळेवर, आठ ते दहा आत्मघातकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ लहान मुलांसह १४९ लोकांचा मृत्यू झाला होता. इतिहासात लहान मुलांवर झालेल्या निर्दयी हल्ल्यांपैकी हा एक ठरला. या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार एहसान होता.
हेही वाचा : सर्वाधिक काळ अवकाशात राहिलेली महिला अंतराळवीर तब्बल अकरा महिन्यांनी परतली पृथ्वीवर..!