काबूल -तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. विशेष करून महिलांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. नुकतंच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी एका गर्भवती महिला पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, बानू नेगर असे महिलेचे नाव होते. या महिलेची मध्य घोर प्रांताची राजधानी फिरोजकोह येथे नातेवाईकांसमोर तालिबान्यांनी हत्या केली.
तालिबान्यांनी शनिवारी बानू नेगरला तिच्या पती आणि मुलांसमोर ठार केले. बानू नेगर ही स्थानिक कारागृहात काम करत होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, शनिवारी तीन बंदूकधारी घरात घुसले. ते अरबी भाषेत बोलत होते. त्यांनी तिला ठार केले. यासंदर्भात तालिबानला विचारणा करण्यात आल्यानंतर, बानू नेगर मृत्यूमध्ये आमचा कोणताही सहभाग नाही आणि आम्ही या घटनेची चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटलं.
आम्हाला या घटनेची माहिती आहे आणि तालिबान्यांनी तिची हत्या केली नाही, याची मी पुष्टी करत आहे. आमचा तपास चालू आहे. तालिबानने यापूर्वीच्या प्रशासनासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, असे तालिाबनचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद म्हणाले.