काबूल -अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यातील शोटुल जिल्ह्याचे केंद्र ताब्यात घेतल्याचा दावा तालिबान्यांनी केला आहे. पंजशीरच्या सैनिकांच्या पराभव करत जिल्ह्यातील पंजशीर सैनिकांच्या 11 चौक्यावर ताबा मिळवल्याचे त्यांनी म्हटलं आहे. लढाईत तालिबानकडून पंजशीरचे 34 सैनिक ठार झाल्याचे तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनमुल्ला समनगनी यांनी सांगितलं. मात्र, पंजशीरचे प्रमुख अहमद मसूद यांनी सैनिकांच्या मृत्यूचा दावा फेटाळला असून तालिबानचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटलं.
गुरुवारी रात्री पंजशीरचे सैनिक आणि तालिबान्यांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात 350 तालिबानी ठार झाले आहेत. तालिबान्यांनी सिराज डोंगररांगातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंजशीरच्या सैनिकांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. तालिबान्यांचे मृतदेह तसेच पडले असून त्यांनी फक्त 40 मृतदेह परत नेले आहेत, असे पंजशीरचे प्रवक्ते फहीम दश्ती यांनी सांगितले. पंजशीर अद्याप अभेद्य असल्याचे त्यांनी म्हटलं.
अमेरिकेन सैन्यांच्या माघारीनंतर पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. आता तालिबानने अहमद मसूद यांच्या नियंत्रणात असलेल्या पंजशीर खोऱ्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, अफगाणिस्तानात गृहयुद्ध सुरू झाल्यापासून पंजशीर खोरे अभेद्य राहिले आहे. तालिबानला कधीच पंजशीरवर ताबा मिळवता आलेला नाही.