महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जलालाबाद शहर तालिबानच्या ताब्यात; अफगाणिस्तान सरकारच्या हाती उरलं फक्त काबूल - अफगाणिस्तान

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कहर कायम आहे. दररोज तालिबान काबुलच्या दिशेने पाऊल टाकत आहे. काबूलच्या मार्गातील सर्व शहरांचा ताबा तालिबान घेत आहे. तालिबानने नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबादवरही कब्जा मिळवला आहे. अफगाणिस्ताच्या प्रमुख शहरांपैकी फक्त काबूल शहर सरकारच्या ताब्यात आहे.

Taliban
तालिबान

By

Published : Aug 15, 2021, 9:47 AM IST

काबूल - अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांपैकी एक असलेले नांगरहार प्रांतातील जलालाबाद शहर हेही अफगाणिस्तान सरकारच्या हातून निसटले आहे. आता फक्त प्रमुख शहर काबूल सरकारकडे उरले आहे. तालिबानी सध्या राजधानी काबूलपासून केवळ 80 किलोमीटर अंतरावर आहेत. येत्या काही दिवसांमध्येच तालिबान काबूलवरही ताबा मिळवेल, असे म्हटलं जात आहे.

अमेरिकन सैन्य माघारी परतल्याने अफगाणिस्तानमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. तालिबान आणि अफगाणी सैन्यातील लढाईत सामान्य जनता भरडली जात आहे. नागरिकांना आपले घर-दार सोडून पलायन करावे लागत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे.

सैन्य माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम -

अफगाणिस्तानातून माघार घेण्यासाठी अमेरिकेला सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी उरलेला आहे. अमेरिका अफगाणिस्तानातून माघार घेत असतानाच तालिबानचा अफगाणिस्तानातील प्रभाव वाढत असून आतापर्यंत दोन तृतीयांश भूभागावर तालिबानने ताबा मिळविला आहे. तालिबानच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातून सैन्य माघार घेण्यावर बायडेन प्रशासन ठाम आहे.

महिलांसाठी 'काळे दिवस' परतले!

तालिबानमधील स्थितीचा महिलांवर सर्वाधिक वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानातील अनेक महिला पुन्हा तालिबानचे काळे दिवस येतील अशी भीती व्यक्त करताना दिसत आहे. तालिबान इथे दाखल झाले आहे. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे असे हेरातची रहिवासी असलेल्या 26 वर्षीय झाहराने सांगितले. शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतलेल्या माझ्यासारख्या महिलेला आता स्वतःला घरातच कोंडून घेणे कसे शक्य होईल असे ती म्हणाली.

तालिबान अफगाणिस्तात सत्तेत आल्यास भारताला धोका -

पाकिस्तानातील लश्कर-ए-तोएबा या संघटनेचे तालिबानशी खोल संबंध असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तालिबान नेतृत्वाचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) सोबत चांगले संबंध आहेत. तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवला, तर अफगाणिस्तानचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जाईल, अशी भारताला भीती आहे.

हेही वाचा -कंदाहार, हेरातवर तालिबानचा ताबा; दोन तृतीयांश अफगाणिस्तान सरकारच्या हातातून निसटले!

हेही वाचा -तालिबानी दहशतावाद्यांचा पराभव करण्याकरिता अफगाण सरकारने 'हा' आखला प्लॅन

हेही वाचा -"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका

हेही वाचा -पुलित्झर पुरस्कार प्राप्त भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात ठार

ABOUT THE AUTHOR

...view details