काबूल : युद्धग्रस्त अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने आपला पहिला "फतवा" जारी करत हेरात प्रांतात मुला-मुलींचे सहशिक्षण बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तालिबानच्या अधिपत्याखालील नव्या अफगाणिस्तानात नागरिकांना कशा परिस्थितीचा सामना करावा लागेल याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो.
बैठकीनंतर घेतला निर्णय
खमा वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे. विद्यापीठातील प्राध्यापक, खासगी संस्थांचे मालक आणि तालिबानी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे यात म्हटले आहे. मुला-मुलींचे सहशिक्षण हेच समाजातील समस्यांचे मूळ असल्याचे सांगत यावर हेरात प्रांतात बंदी घालण्याची घोषणा तालिबानने केली आहे.
सहशिक्षण हेच समस्यांचे मूळ
याला दुसरा कोणताही पर्याय नसून सह-शिक्षण हे बंदच झाले पाहिजे असे तालिबानचा प्रतिनिधी आणि उच्च शिक्षण विभागाचे प्रमुख मुल्ला फरीद तीन तास चाललेल्या बैठकीनंतर बोलताना म्हणाला. महिला शिक्षकांना केवळ मुलींनाच शिकविण्याची परवानगी दिली जाईल. त्या मुलांना शिकवणार नाही. समाजातील समस्यांचे सहशिक्षण हेच मूळ आहे असेही तो यावेळी म्हणाला.