नवी दिल्ली -अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान संघर्षात भारताने लष्करी भूमिका बजावू नये, असा इशारातालिबान संघटनेचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी भारताला दिला आहे. वृतसंस्था एएनआयच्या प्रतिनिधीशी बोलताना, अफगाणिस्तानात भारताने केलेल्या विकासकामांचे कौतुकही शाहीन यांनी केले. तर तालिबान इतर देशांचे दुतावास किंवा त्यांच्या नागरिकांना लक्ष्य करणार नाही, असे आश्वासन दिले. याचबरोबर तालिबानचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबा सोबतचे संबंधही यावेळी त्यांनी नाकारले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारतासह इतर कोणत्याही परदेशी देशाविरुद्ध कारवायांसाठी केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
तालिबान दुतावासाला किंवा नागरिकांना लक्ष्य करणार नाही -
गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेताच तालिबानचा अफगाणिस्तानातील प्रभाव वाढला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळविला आहे. तर राजधानी काबूलपासून फक्त 50 ते 80 किमी अंतरावर तालिबान आहे. या परिस्थितीमध्ये अनेक देशांनी अफगाणिस्तानमधील आपल्या दुतावासातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी सैन्य पाठवले आहे. यावर तालिबान संघटनेचे प्रवक्ता सुहैल शाहीन यांनी तालिबान कोणत्याच दुतवासाला किंवा नागरिकांना लक्ष्य करणार नाही, असा विश्वास दिला आहे. यापूर्वी आम्ही हे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानातील भारताची विकासकामे कौतुकास्पद -
अफगाणिस्तानात भारताच्या भूमिकेवर सुहैल शाहीन यांनी भाष्य केले. भारताने अफगाणिस्तानात लष्करी भूमिका बजावू नये. असे केल्यास त्यांच्यासाठी हे चांगले राहणार नाही. ज्या इतर देशांनी अफगाणिस्तानात लष्कर पाठवले, त्यांची काय अवस्था झाली, हे भारताने पाहावे. त्यांच्यासाठी ते खुले पुस्तक आहे, असे सुहैल शाहीन म्हणाले. भारताने अफागाणिस्तानात केलेल्या विकासकामांचे सुहैल शाहीन यांनी कौतुक केले. भारताने अफगाणिस्तानमधील लोकांच्या आर्थिक समृद्धीसाठी धरणे, राष्ट्रीय प्रकल्प, पायाभूत सुविधा उभारल्या. त्याची आम्ही प्रशंसा करतो, असे शाहिन म्हणाले. संसद, शाळा, रस्ते, धरणे निर्माण करण्यासाठी भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे. भारताने अफगाणिस्तानला 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मदत दिली आहे. तसेच भारत नेहमीच तालिबान-अफगाणिस्तान शांतात चर्चेस पाठिंबा देत आला आहे.
अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक सुरक्षित -
अफगाणिस्तानच्या पाकतिया प्रांतातील एका गुरुद्वारामध्ये शीख धार्मिक ध्वज उतरवण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. यावर शाहिन यांनी स्पष्टीकरण दिले. शीख समुदायाने धार्मिक ध्वज स्वतः उतरवला. याबाबत त्यांना जबरदस्ती करण्यात आली नव्हती, असा दावा त्यांनी केला. तसेच अल्पसंख्याक समुदायाला त्यांचे धार्मिक विधी करण्याची परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले.