महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

महागाईने पाकिस्तानी नागरिक बेहाल; 100 रुपये किलोने मिळतेय साखर

पाकिस्तानमध्ये महागाईने डोकं वर काढलं आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानचे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या साखर 100 रुपये किलो दराने मिळत आहे.

इम्रान खान
इम्रान खान

By

Published : Apr 4, 2021, 5:32 PM IST

इस्लामाबाद - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केले. लॉकडाऊनचा परिणाम देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. आपला शेजारी पाकिस्तान देश कोरोनाच्या पूर्वीपासूनच मंदीचा सामना करत होता. त्यात कोरोनाने आणखी भर टाकली. सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार इतर देशांकडून कर्ज घेत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये महागाईने डोकं वर काढलं आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानचे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या साखर 100 रुपये किलो दराने मिळत आहे.

शेजारी देश पाकिस्तानमध्ये भाज्यां, दुध, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानच्या इतिहासातील साखरेचा हा सर्वाधिक जास्त भाव आहे. तर पंतप्रधान इम्रान खान यांचे सहकारी शहजाद अकबर यांनी वाढत्या साखरेच्या किंमतीचे खापर साठेबाजांवर फोडले आहे. देशात साखरेची कमतरता असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे साखरेच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानच्या एफआयए याप्रकरणी अनेकांवर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

कराचीमध्ये मीटची किंमत 500 रुपये किलो झाली आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर लाहोरमध्ये चीकनची किंमत 365 रुपये किलो असल्याची माहिती आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान इम्रान खान यांनी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील बाजार समित्या बरखास्त केल्या होत्या. गरजेच्या वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. या दोन्ही राज्यातून भ्रष्टाचार आणि गैर व्यवस्थापनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

अंड्यांचे देखील भाव गगनाला भिडले

पाकिस्तान गॅस संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये गॅसचा पूरवठा करणारी कंपनी सुई नॉर्दन 500 मिलियन स्‍टैंडर्ड क्‍यूबिक फुट प्रतिदिन गॅसच्या कमीचा सामना करत आहे. तसेच देशात अंड्यांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. इम्रान खान यांनी डॉ. अब्दुल हफीज शेख यांना हटवून हम्माद अजहर यांना अर्थमंत्री केले. मात्र, महागाईचा दर मात्र वाढतच चालला आहे. शेख यांना गेल्या वर्षी अर्थ मंत्री करण्यात आले होते. 2018 मध्ये इम्रान खान सत्तेत आल्यापासून अजहर हे तिसरे अर्थमंत्री आहेत.

भारतातून साखर आणि कापूस आयातीचा निर्णय रद्द

महागाईचा सामना करण्यासाठी भारतातून साखर आणि कापूस आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला होता. मात्र, अंतर्गत राजकारणामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी माघार घेतली. गुरुवारी इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतातून आयात करण्याचा निर्णय रद्द केला आहे. भारतातून आयात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इम्रान खान यांच्यावर बरीच टीका झाली होती.

हेही वाचा -पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; देशातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details