काबूल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जेनंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान दररोज अफगाणिस्तानचे नवीन प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने आता पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तर तालिबानचा वाढता प्रभाव पाहता अहमद मसूदने तालिबानला पंजशीरमधील संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले असून शांतता चर्चेसाठी आपले दरवाजे खुले असल्याचं म्हटलं. तालिबानने हल्ले थांबवले तर आम्ही लढाई रोखण्यास तयार आहोत, असे अहमद मसूद यांनी म्हटलं आहे. तर यावर तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबानी समोरासमोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालिबान्यांकडून सातत्याने पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंजशीर काबीज केल्याचा दावा तालिबानने केला आहे. तर नॉर्दर्न अलायन्सने तालिबानचा दावा फेटाळला आहे. गेल्या दिवसात तालिबानकडून पंजशीरमध्ये हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (NRF) ने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात तालिबानकडे युद्धबंदीचे आणि चर्चेतून समस्या सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय पंजशीरवर लादलेले निर्बंध हटवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे आवाहन तालिबानला करण्यात आले आहे.
ताज्या माहितीनुसार, तालिबान विरूद्धच्या लढ्यात नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानला मोठा झटका बसला आहे. या हल्ल्यात रेझिस्टन्स फ्रंटचे प्रवक्ते फहीम दश्ती ठार झाले. या हल्ल्यात जनरल अब्दुल वुदूद जारा यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. फहीम दश्ती यांचा मृत्यू नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानसाठी मोठा धक्का आहे. कारण, ते अहमद मसूदच्या खूप जवळचे होते. अहमद मसूद आणि त्याचे वडील अहमद शाह मसूद यांच्या अत्यंत घनिष्ट नाते होते. 26/11 च्या दोन दिवसांनी अहमद शाह मसूद यांच्यावर हल्ला झाला. तेव्हा फहीम दश्ती त्यांच्यासोबत होते. फहीम दश्ती आणि अब्दुल वुदूद यांच्या मृत्यूनंतर आणखी नुकसान नको, या दृष्ट्रीकोनातून अहमद मसूद यांनी वाटाघाटीसाठी पुढाकार घेतल्याचे म्हटलं जात आहे.