कोलंबो -श्रीलंकेचे नव्याने निवडून आलेले अध्यक्ष गोताबाय राजपक्षे दोन दिवसीय भारत दौऱयावर आले असून शुक्रवारी मोदींची भेट घेणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे मोदींचं आमंत्रण घेऊन स्वतः श्रीलंकेत गेले होते.
नुकत्याच झालेल्या श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीत गोताबाया राजपक्षे विजयी झाले. १६ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत त्यांनी 52 टक्क्याहून अधिक मते मिळवली आणि श्रीलंकेचे सातवे अध्यक्ष आणि अध्यक्षपदी येणारे पहिले निवृत्त लष्करी अधिकारी झाले आहेत.
गोताबाय यांच्यावर उच्च न्यायालयात १ लाख ८५ हजार अमेरिकन डॉलर्सच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता. त्यांच्यावरील सर्व भ्रष्टाचाराचे सर्व आरोप हटवण्यात आले आहेत. तसेच, राजपक्षे यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. त्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली होती.
दरम्यान आरोप हटवण्यात आल्याने पासपोर्ट परत करण्यात आला आहे. राजपक्षे यांच्यावरील बंदी हटविण्यात आल्यानंतर ते पहिल्याच परदेशी दौऱ्यासाठी भारतात आले आहेत.
सध्या एकाच परिवाराकडे श्रीलंकेची सत्ता एकवटली आहे. श्रीलंकेच्या राजकारणाची ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा देशाची सत्ता दोन भावांच्या ताब्यात देण्यात आली आहे.