कोलंबो :श्रीलंकेच्या नौदलाने ५४ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच त्यांनी पाच मासे पकडण्याच्या बोटीही जप्त केल्या आहेत. हे मच्छिमार श्रीलंकेच्या समुद्री हद्दीत गेल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे.
बुधवारी श्रीलंकेच्या उत्तर आणि ईशान्य भागातून या मच्छिमारांना अटक करण्यात आली. बाहेरील देशातील मच्छिमार आपल्या हद्दीत येत असल्यामुळे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे श्रीलंकेचे नौदल नियमीतपणे गस्त घालत असते, अशी माहिती श्रीलंकेने दिली.
पाच नौका केल्या जप्त..
बुधवारी जाफ्फनाच्या कोविलन समुद्रकिनाऱ्यापासून ३ समुद्री मैलांवरुन एक भारतीय मच्छिमार नौका ताब्यात घेण्यात आली. या बोटीवरुन १४ लोकांना अटक करण्यात आली. तसेच, पेसालाई, मन्नार आणि इरानातिवू बेटावरुन काही समुद्री मैलांवर असणाऱ्या दोन बोटी ताब्यात घेण्यात आल्या. या बोटींवर प्रत्येकी २० भारतीय होते, अशी माहिती देण्यात आली. मुल्लैटिवू बेटापासून ७.५ आणि ८.५ समुद्री मैलांवरुन एक-एक भारतीय मच्छिमार नौका जप्त करण्यात आली. या बोटींवर प्रत्येकी २० भारतीय होते, ज्यांना श्रीलंकेने अटक केली.
यापूर्वीही अशा प्रकारे नौकांना जप्त करण्यात आले होते. त्या-त्या वेळी याबाबत भारतीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. जानेवारीमध्येही श्रीलंकेच्या नौदलाने नऊ भारतीय मच्छिमारांना अटक केली होती.
हेही वाचा :आशियाई लोकांचा द्वेष करणे थांबवा; अमेरिकेत रॅली काढून निषेध