इस्लामाबाद - एका विशेष न्यायालयाने, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर केली आहे. देशद्रोहाचा आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली आहे.
पेशावर उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश वकार अहमद सेठ, सिंध उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नजर अकबर आणि लाहोर उच्च न्यायालयातील न्यायामूर्ती शाहीद करीम यांनी संयुक्तरित्या याबाबत निकाल जाहीर केला.
१९ नोव्हेंबरला याबाबतची सुनवाई संपल्यानंतर, १७ डिसेंबरला आपण निकाल जाहीर करू असे या विशेष न्यायालयाने आधीच जाहीर केले होते. २८ नोव्हेंबरलाच हा निकाल जाहीर करण्याचा या विशेष न्यायालयाचा मानस होता. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दाखल केलेल्या एका याचिकेमुळे, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल जाहीर करण्यावर स्थगिती आणली होती.
२००७ साली संविधान निलंबित करून, आणिबाणी घोषित केल्याबद्दल परवेज यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले होते. २०१४ला हे आरोप सिद्ध झाले होते.
दरम्यान, मुशर्रफ हे सध्या आरोग्याचे कारण पुढे करत, दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. आपली खराब प्रकृती आणि आईचे वय या कारणांमुळे आपण पाकिस्तानात परत येण्यास समर्थ नसल्याचे ते सांगत आले आहेत. यामुळेच पाकिस्तानने त्यांना फरारी घोषित केले आहे.