सिडनी - जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अमेरिकेत पोलीस कारवाईदरम्यान मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली आहेत. ऑस्ट्रेलियामध्येही विविध ठिकाणी 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' नावाने निदर्शने करण्यात आली. शांततेत केलेल्या या निदर्शनांमधून हजारो नागरिकांनी जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जितक्या कृष्णवर्णीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्याचाही निषेध नोंदवण्यात आला.
याबाबत आयोजकांनी न्यू साऊथ वेल्सच्या न्यायालयात परवानगी अर्ज केला होता. निदर्शने सुरू होण्याच्या १२ मिनिटे अगोदर न्यायालयाने शांततेत निदर्शने करण्यास परवानगी दिली. तरीही हजारो नागरिकांनी या निदर्शनांत सहभाग घेतला. न्यायालयाची पूर्वपरवानगी मिळाल्याने पोलीस कारवाई करू शकले नाही.
कृष्णवर्णीय नागरिकांच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियात 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर' नावाने निदर्शने क्विन्सलँड राज्याची राजधानी ब्रिस्बेन या ठिकाणी सुमारे ३० हजार नागरिकांनी रस्त्यावर उतरून शांततेत निदर्शने केली. या दरम्यान निदर्शकांनी मुख्य रस्त्यावरील दुकाने बंद करण्यास पोलिसांना भाग पाडले. त्यानंतर पोलीस मुख्यालयावर कृष्णवर्णीय समुदायाचा झेंडा फडकवण्यात आला मात्र, पोलीस न्यायालयाच्या आदेशांमुळे काहीही करू शकले नाही. उलट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निदर्शकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले.
जॉर्ज फ्लॉइडला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जगभरात वातावरण तापले आहे.